अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- पंधारा वर्षांपूर्वीचे पारनेर व सध्याच्या पारनेरमध्ये झालेला बदल शहरातील जनतेच्या डोळयापुढे आहे.
त्यामुळे शहरासाठी काय केले असे सांगून १७/० करण्याच्या वल्गना करणारांना धडा शिकविण्यासाठी शहराचा स्वाभीमान जागृत ठेउन एकदिलाने निवडणूका लढा, मी तुमच्यासोबत आहे, आपण सर्व जागा जिंकू असा विश्वास विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला.
आगामी नगरपंचायत निवडणूक तसेच नगरपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या कामांच्या लोकार्पणासंदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत मा. आ. औटी यांनी कार्यकर्त्यांशी सुमारे पाउन तास हितगुज केले. यावेळी बोलताना औटी म्हणाले, मागील नगरपंचायत निवडणूकीदरम्यान मतदारसंघातील कामांमुळे मला हवे तसे लक्ष घालता आले नाही. या निवडणूकीसाठी मात्र माझ्याकडे भरपूर वेळ असून सर्व १७ उमेदवार निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेलेे दिले जातील.
उमेदवारी देताना आर्थिक निकष पाहिला जाणार नाही. मागील निवडणूकीत झालेल्या चुका या निवडणूकीत होणार नाहीत. निवडणूकीदरम्यान कोठेही काही अडचण असल्यास आपण स्वतः तेथे येउन अडचण दुर करू. अडचणीसंदर्भात सबंधित उमेदवाराने आपणाशी संपर्क करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मी योग्य उमेदवार देईल त्यास सर्वांनी शहराचा स्वाभिमान डोळयापुढे ठेउन एकदिलाने काम करून निवडून आणायचे आहे.
एकदिलाने निवडणूक लढवून आपण सर्व १७ जागा निश्चित जिंकू असा विश्वास व्यक्त करतानाच विधानसभा निवडणूकीतील पराभवाचे शल्य पारनेरकरांना आहे याची मला जाणीव आहे. आता या निवडणूकीत सर्व जागा जिंकून मला ताठ मानेने मुंबईला जाता आले पाहिजे हे लक्षात ठेवा असे ते म्हणाले. बाहेरचे लोक शहरात येउन १७/० ची भाषा करतात. गेल्या वर्षभरात त्यांचा एक रूपयाचा तरी निधी पारनेर शहराला मिळाला का ? असा सवाल औटी यांनी केला.
पंधरा वर्षात काय केले असाही प्रश्न केला जातो. पंधरा वर्षापूर्वीचे पारनेर व सध्याचे पारनेर शहराच्या जनतेपुढे आहे. त्यामुळे कोणी काहीही वल्गना करण्याचे काहीच कारण नाही. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, भुमिगत गटार योजना, विविध ठिकाणी बंधारे या ठळक कामांव्यतिरिक्त विकास कामांची मोठी यादी असून त्याची शहरवासीयांना जाणीव असल्याचे ते म्हणाले. बैठकीस मोठया संख्येने कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved