चायना मांजावर राज्यात बंदी घालण्याची मागणी चायना मांजा पर्यावरणाला हानीकारक ठरुन अनेकांचा बळी घेत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांचा बळी घेणार्‍या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखा बंदीप्रमाणे बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, अत्तर खान, शहानवाझ शेख, वसीम शेख, फईम इनामदार, अनिकेत येमूल, शुभम रासकर, सचिन रायकर, शहेजाद खान, सोफियान शेख, अन्सार सय्यद, अन्वर शेख, सरफराज कुरेशी, मिजान कुरेशी, हाजी लाला, ताज खान, अन्सार सय्यद, सिध्दार्थ आढाव, मुन्नवर शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात युवक पतंग उडवितात. पतंगबाजीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जीवघेण्या चायना (नायलॉन) मांजाचा वापर होत आहे.

चायना तसेच नायलॉन मांजाची शहरात सर्रास विक्री होत असताना देखील डोळेझाक केली जात आहे. चायना मांजा लवकर तुटत नसल्याने, काही वर्षापासून अनेक नागरिकांचे गळे व हात कापले गेले आहेत. तर या मांजामुळे पशु, पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात बळी जावून, त्यांचे असतित्व धोक्यात आले आहे. या जीवघेण्या चायना व नायलॉन मांजावर राज्यात सुरु असलेल्या गुटखा बंदी प्रमाणे बंदी घालण्याची गरज आहे.

केंद्र सरकार मेक इन इंडियाचा नारा देत असताना या चायना मांजाची एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री कशाप्रकारे होत आहे. प्रशासनाच्या वतीने फक्त दिखाव्यापुरती चायना मांजावर कारवाई करण्यात येते, मात्र त्यावर पुर्णत: बंदी आनण्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. मनुष्यासह पशु, पक्ष्यांचे जीव घेणार्‍या चायना मांजावर सक्तीने बंदी घालून, विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी.

तसेच याला कायमचा प्रतिबंध करण्यासाठी गुटखा बंदीप्रमाणे चायना तसेच नायलॉन मांजावर बंदी आनण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. चायना मांजा पर्यावरणाला हानीकारक ठरुन अनेक पशु-पक्षी व मनुष्यांचा बळी घेत आहे. चायना मांजावर कायमची बंदी आनण्याची गरज आहे. दरवर्षी अनेकांचा बळी जात असताना यावर तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केली.तर शहरात चायना मांजाची विक्री झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved