मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको आंदोलकांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

तर भारत बंद मध्ये सहभागी होत तातडीने शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली. देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, किसान सभेचे विकास गेरंगे, रामदास वागस्कर, सतीश पवार, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, सतीश भूस, सुभाष कांबळे,

सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, पीस फाऊंडेशनचे अर्शद शेख, अब्दुल रहेमान, शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब थोटे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकाराम, संध्या मेढे, नंदू डहाणे, सुभाष कांबळे, अशोक बाबर, अजय दिघे आदि सहभागी झाले होते. अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन हे राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे आहे.

हे आंदोलन दडपण्यासाठी दलालांचे भाजप सरकार चुकीचे आरोप करुन शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनात फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला असून, हे काळे कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. केंद्रात असलेले भांडवलशाही पुरस्कृत सरकार सर्वसामान्य कामगार व शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अविनाश घुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कायद्याच्या तरतुदी अत्यंत घातक आहे. यामुळे शेतकरी, हमाल, मापाडी देशोधडीला लागणार आहे. मार्केट कमिटी बरखास्त करण्याची यामध्ये असलेली तरतुदीमुळे हमाल, मापाडी उघड्यावर येणार आहे. कोणताही विचार न करता हुकुमशाही पध्दतीने हे कायदे शेतकर्‍यांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष अथवा शेतकरी संघटनेची मागणी नसताना हे चुकीचे कायदे माथी मारण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधून, केंद्रातील भाजप सरकार मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला. या देशव्यापी बंद मध्ये संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment