अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सांगितले.

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते ‘कासीमखान महाल ते जिल्हाधिकारी निवास’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, एतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर, अभीरक्षक डॉ. संतोष यादव आदी उपस्थित होते.

डाॅ. यादव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात निजामशाहीतील वैभवशाली कासीमखान महालाची (सध्याचे नगर निवास) सचित्र माहिती तेथील वैशिष्ट्यांसह देण्यात आली आहे.

नगर शहराच्या स्थापनेपासून म्हणजे पाचशेहून अधिक वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची साक्षीदार असलेली ही वास्तू अजूनही ठणठणीत असून पहिले युरोपियन जिल्हाधिकारी हेन्री पाॅटिंजरपासून आजवरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या आलिशान महालातच वास्तव्य करण्यास पसंती दिली आहे.

मक्केहून आणलेले दोन पवित्र खांब या महालाच्या दिवाणखान्यात असून नगरच्या निजामशाहीची अनेक वैशिष्ट्ये तेथे पाहण्यास मिळतात. पूर्वी खापरी नळाने या महालाला व उद्यानाला पाणी पुरवठा केला जात असे.

फ्रान्सस्थित ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डाॅ. शशी धर्माधिकारी यांनी या पुस्तकासाठी महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. माजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे डाॅ. यादव यांनी सांगितले.

यावेळी अनौपचारिक चर्चा करताना जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी आपल्याला इतिहासाची आवड असून नगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment