अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी झाले चक्क श्वानाचे डोहाळेजेवण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-डोहाळजेवण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा येतो.

पण नगरमध्ये चक्क एका पाळीव श्वानाचे डोहाळजेवण करण्यात आले. सावेडी येथील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी कुटुंबीयांनी लहासा अॅप्सो जातीच्या ‘ल्युसी’ या श्वानाला पोटच्या मुलीप्रमाणे लाडाने पाळत मोठे केले.

त्यांना ल्युसीच्या आयुष्यात प्रथमच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची ‘गुड न्यूज’ कळताच तिचेही मुली प्रमाणे साग्रसंगीत डोहाळजेवण साजरे करण्याचा निर्णय घेत जय्यत तयारी केली.

महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या टीव्ही वरील डान्स स्पर्धेतील विजेता व अभिनेता राहुल कुलकर्णी व शैला कुलकर्णी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले.

सावेडीनाका येथे महिलेला डोहाळजेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते त्याचप्रमाणे ल्युसिलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून व हेअरस्टाईल करून नटवण्यात आले.

परिसरातील महिलांनी तिला औक्षण करून ओटीही भरली. हा सर्व प्रकार ल्युसीला समजत नसला तरीही ती झोक्यावर शांत बसून हे सगळे करवून घेत होती.

पेढा की बर्फीच्या वाट्या ल्युसी पुढे धरल्या असता तिने बर्फीच पसंत केल्यावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. गोड अल्पोपहाराने या अनोख्या डोहाळेजेवणाच्या सोहळ्याची सांगता झाली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment