अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- भिंगार शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सध्या एमआयडीसी पाणी योजनेतुन भिंगार शहरासह मिलीटरी एरियाला पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र प्रचलित पाणीपुरवठा व्यवस्था ही ४० वर्षांची जुनी असल्याने वारंवार नादुरुस्त होत असून पाणी पुरवठा नेहमीच विस्कळीत होत आहे. तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने भिंगार शहर वासियांची गैरसोय होत आहे.

या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आ संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आज बैठकीचे करुन प्रशासकिय स्तरावर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यात अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत पाणी योजनेचे काम पुर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे मनपाचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.
तोपर्यंत कापूरवाडी तलावाच्या विहीरीतून भिंगार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
याच बरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बु्ऱ्हाणनगर चाळीस गाव पाणी योजनेतुन पाणी पुरवठा उपलब्ध होण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com