महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची हकालपट्टी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे याची अखेर आस्थापना विभागातून हकालपट्टी करण्यात आली. सहायक आयुक्त राऊत यांच्याकडे या विभागाचा पदभार देण्यात आला.

लहारे यांच्याविरोधात महिला कर्मचार्‍यांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी लहारे यांच्याबाबत काही महिला कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या होत्या.

दैनंदिन काम करत असताना लहारे महिला कर्मचार्‍यांकडून अपेक्षा व्यक्त करतात, असा गंभीर आरोप त्यात होता. या तक्रारीनुसार सहा महिन्यापूर्वी महिला तक्रार निवारण समितीचे एक पथक चौकशीसाठी आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्‍याने मोबाईलवरून पाठविलेले संदेश पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता.

शिवाय समितीने केलेल्या चौकशीत अन्य काही बाबी पुढे आल्या होत्या. महिला संरक्षण समितीचा अहवाल आल्यानंतरही लहारे यांना अभय देण्याचे काम वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होत होते. कारवाईबाबत विचारणा होऊ लागल्यानंतर नेमकी काय कारवाई करायची, याचा उल्लेख त्यात नाही, असे सांगून जबाबदारी टाळण्यात येत होती.

एवढेच नव्हे, तर महिला संरक्षण समितीला पत्र पाठवून नेमकी काय कारवाई करायची, अशी विचारणाही करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मायकलवार यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी काही आदेश काढले. त्यात लहारे यांची बदली प्रभारी नगरसचिवपदी करण्यात आली होती. मात्र या आदेशासोबत अन्य काही काढलेले आदेश वादग्रस्त होते.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पदभार घेतल्यानंतर मायकलवार यांनी 31 डिसेंबरला काढलेले आदेश स्थगित केल्याने लहारे यांच्या बदलीचाही आदेश स्थगित झाला. दरम्यान नुकतेच जिल्हाधिकारी भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेचे आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे याची अखेर आस्थापना विभागातून हकालपट्टी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!