पारनेर नंतर आता ‘या’ तालुक्यातील तब्बल ३१ गावांत कंटेनमेंट झोन.!

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महसूल व आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

यापूर्वी पारनेर तालुक्यातील काही गावांत लॉकडाऊन करण्यात आले असतानाच आता संगमनेर तालुक्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात चार ठिकाणी तर तालुक्यातील तब्बल ३१ गावात कंटेनमेंट झोन लागू करण्यात आले आहेत.

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा बैठक घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला दिली होती.

यानंतर प्रशासनाने तालुक्यातील काही गावे व शहरातील भाग प्रतिबंधित केला आहे. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोरोना बैठकीचा आढावा घेत स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

संगमनेर शहरामध्ये भरतनगर, गणेशनगर, जनता नगर आदी भागातील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. तर तालुक्यातील ३१ गावात कंटेनमेंट झोन लागू करण्यात आले आहेत.