अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात १ टीएमसी पाण्याची आवक

Published on -

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसभरात १ टीएमसीवर पाण्याची आवक झाली होती. भंडारदरा धरणात २४ तासांत ९३२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरणात सध्या २१ हजार ७९६ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१.५२ टक्के पाणीसाठा होता. धरणात कोतूळ येथून पाण्याची आवक ६५९२ क्युसेक सुरू होती.

भंडारदरा धरणात सध्या ९ हजार ७१४ दलघफू म्हणजे ८८ टक्के, निळवंडे धरणात ७ हजार ४११ दलघफू म्हणजे ८९.०७ टक्के पाणीसाठा होता. मागील दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरण लवकर तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे. धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने नदीपात्रातही विसर्ग सुरू आहे.

भंडारदरा धरणात मागील वर्षी याच दिवशी ८२.२३ टक्के, निळवंडे धरणात ४५.९७ टक्के, तर मुळा धरणात ५७.१५ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

आढळा, सीना व विसापूर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी पाणलोटात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणे लवकर तुडुंब भरणार आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात नाशिककडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने यावर्षी समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा उद्भवणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मागील चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू असल्याने मुळा धरण यावर्षी पंधरा ऑगस्टपूर्वी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१ जूनपासून धरणात झालेली नवीन पाण्याची आवक

भंडारदरा धरणात १ जून २०२५ पासून आजपर्यंत १२ हजार ९८७ दलघफू, – निळवंडे धरणात ११ हजार ३८९ दलघफू, तर मुळा धरणात १४ हजार ४९३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत ६१ मिमी, तर एकूण १६८३ मिमी, निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत १९ मिमी, तर एकूण ७५८ मिमी पाऊस झाला. मुळा धरणाच्या पाणलोटात एकूण १२९ मिमी पाऊस झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!