अहिल्यानगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्त शनिवारी, २ ऑगस्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतून शनिवारी, २ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी किसान सन्मान योजने अंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये अनुदान देण्यात येते. वर्षभरात असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. दि.२ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात २० वा हप्ता जमा होणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते किंवा किटकनाशके किंवा शेतीच्या कामांसाठी या निधीचा आधार मिळतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही मदत अतिशय उपयुक्त ठरत आहे. विविध आपत्ती काळात शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेची ही मदत महत्त्वाचा आधार बनते. मागील १९ हप्ते ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात न चुकता पडली आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

तुमच्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ
पीएम किसान योजने अंतर्गत अकोला तालुक्यातील ३४ हजार ९४८ शेतकऱ्यांना ६.९९ कोटी मिळणार आहेत. जामखेड २९ हजार ५८ शेतकऱ्यांना ५.८१ कोटी , कर्जत ४३ हजार ६१० शेतकऱ्यांना ८.७२ कोटी, कोपरगाव २९ हजार ६४० शेतकऱ्यांना ५.९३ कोटी , अहिल्यानगर ३१ हजार २० शेतकऱ्यांना ६.२० कोटी, नेवासा ५४ हजार २८९ शेतकऱ्यांना १०.८६ कोटी , पारनेर ५० हजार ३८३ शेतकऱ्यांना १०.०८ कोटी, पाथर्डी ३९ हजार ९५५ शेतकऱ्यांना ७.९९ कोटी , राहाता २४ हजार १०८ शेतकऱ्यांना ४.८२ कोटी , राहुरी ३८ हजार ५६३ शेतकऱ्यांना ७.७१ कोटी, संगमनेर ५९ हजार १२८ शेतकऱ्यांना ११.८३ कोटी, शेवगाव ४१ हजार ९०१ शेतकऱ्यांना ८.३८ कोटी, श्रीगोंदा ५० हजार ५७१ शेतकऱ्यांना १०.११ कोटी, श्रीरामपूर २२ हजार ३४३ शेतकऱ्यांना ४.४७ कोटी अनुदान मिळणार आहे.