भंडारदरा- अहिल्यानगर तालुक्यातील ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर भागात तब्बल १७७ मिमी म्हणजेच सात इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या सांडव्यातून व वीज निर्मिती केंद्रातून एकूण ९ हजार ७७४ क्युसेकने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता ७३.१३ टक्के झाला आहे. धरणात ८ हजार ७३ दलघफू पाणीसाठा नोंदवला गेला आहे. निळवंडे धरणामध्ये भंडारदऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे साठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, धरण ८४.६७ टक्के भरले आहे. निळवंडे धरणातून सोमवारपासून १३ हजार ९९४ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती धरण शाखेकडून देण्यात आली आहे. धरण परिसरातील रंधा धबधब्याने देखील रौद्ररूप धारण केले असून, मोठ्या जलप्रवाहामुळे परिसरात जलसंकटाची स्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः रतनवाडीमध्ये घाटघरपेक्षाही अधिक, म्हणजे १८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पांजरे येथे १४३ मिमी, वाकी येथे ९८ मिमी, तर भंडारदरा भागात १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कळसुबाई शिखरावर संततधार कोसळत असून, त्याचा परिणाम वाकी लघुबंधाऱ्यावरही जाणवत आहे. तेथून कृष्णावंती नदीमध्ये १ हजार ५७३ क्युसेसने विसर्ग सुरू असून, परिसरातील नद्या उफाळून वाहत आहेत.