अहिल्यानगर- राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५/२६ साठी २ लाख २२ हजार मृद नमुने तपासणीसाठी ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२५/२६ चे राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता आहे. सन २०२५/२६ च्या राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.
कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) कृषी आयुक्तालय पुणे यांच्या प्राप्त पत्रानुसार अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन २०२५/२६ मध्ये ग्रामस्तरीय मृद चाचणी तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदशक सूचनान्वये सदर प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालय आणि कृषी व्यावसाय केंद्रे, माजी सैनिक बचत गट, शेतकरी शेतकरी सहकारी संस्था, कृषी आवश्यक, निविष्ठा किरकोळ विक्रेते आणि शाळा /कॉलेज, युवक/युवती यांना द्यावयाच्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी लाभार्थ्याकडुन अर्ज घेण्याची कार्यवाही चालू आहे.
इच्छुक लाभार्थ्याने ८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावेत. सदर ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी दीड लाखाचे अर्थसहाय्य आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून सोडत काढण्यात येऊन लाभार्थ्याची निवड होणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.