अहिल्यानगर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. जिल्हा परिषद शाळांतील ४ विद्यार्थ्यांचा, तर खासगी शाळांतील १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी दिली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ९ जुलै रोजी लागला आहे. राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातील १० विद्यार्थ्यांचा, शहरी भागातील शाळांतील ६ विद्यार्थ्यांचा, तर सीबीएससी/आयसीएससीच्या २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, यामध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचे ४ विद्यार्थी, खासगी शाळांचे ५ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत खासगी शाळांचे ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
इयत्ता पाचवी शहरी भागातील महादजी शिंदे शिंदे विद्यालय श्रीगोंदा येथील वेदांत राहुल दळवी दहावा, समर्थ प्राथमिक विद्यामंदिर कर्जतचा व आयसीएससी अभ्यासक्रमाच्या शाळेतून ध्रुव अकॅडमी संगमनेरचा आरुष केदार सराफ पहिला, परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल अकोलेची आदिश्री संतोष म्हस्के चौदावी आली.
इयत्ता आठवीतून ग्रामीण भागातील कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कोकमठाणच्या श्रेयस नानासाहेब नलावडे अकरावा, श्रेयस प्रकाश भवर व धनश्री राहुल रकटे हे दोघे तेराव्या, श्रीतेज रामराजे इंगोले व सिद्धार्थ संदीप पगार हे दोघे गुणवत्ता यादीत सोळावे आले.
इयत्ता आठवीच्या परीक्षेतून शहरी भागातून पारनेर पब्लिक स्कूल पारनेरचा वैष्णव भाऊसाहेब कोल्हे चौथा, रेसिडेन्सियल हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजचा पियुष शिशिर काठमोर व श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंद्या येथील अनुष्का नितीन झिटे हे दोघे बाराव्या, तर स. न. सोनमाळी कन्या विद्यामंदिर कर्जतची अनुष्का संदीप काकडे ही राज्य गुणवत्ता यादीत चौदावी आली.
पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल २८.५३ टक्के लागला. इयत्ता आठवी शिष्यवृत्तीचा निकाल २०.४९ टक्के लागला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळांतील २८९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले. गतवर्षर्षीपेक्षा ५५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत वाढले. तर १ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आला.
१०६६ जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. निकालात ६.५४ टक्के वाढ झाली. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळांतील १९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले. ६.२४ टक्क्यांनी निकाल वाढला. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शुन्य टक्के निकालाच्या १०५ जि. प. शाळा व शुन्य टक्के निकालाच्या ६२ शाळा कमी झाल्या. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकालाच्या ४१ शाळा ठरल्या, तर यात एक शाळा वाढली. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकालाच्या ३ जि. प. शाळा ठरल्या.
यात २ शाळा वाढल्या. पाचवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत येणाऱ्या शाळांत १३१ ने वाढ झाली. आठवीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत येणाऱ्या शाळांमध्ये दोनने वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी सांगितले.
झेडपी शाळेचे चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कर्जत तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा रुईगव्हाणच्या संस्कृती राजेंद्र शेलार राज्य गुणवत्ता यादीत आठवी आली. अकोले तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा धामणगाव आवारी येथील स्वरा मच्छिंद्रनाथ रासकर, जामखेड तालुक्यातील जि. प. शाळा माळी वस्ती शिऊर येथील सारंग प्रदीप झुंजरुक, जामखेड तालुक्यातील जि. प. शाळा वारगजे वस्ती येथील अलोक ज्ञानेश्वर कौल, कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पिंपळवाडी येथील शर्वरी सुनील भोसले हे चार जण गुणवत्ता यादीत अकरावे आले.