अहिल्यानगर- जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी कसे काम करतात. कोणत्या विभागात उणिवा आहेत. कोणता विभाग चांगला काम करतो. यासंदर्भात नागरिकांना आता थेट अभिप्राय देण्याची संधी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यावरील नागरिकांची मते जाणून सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० जून ते ९ जुलै दरम्यान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे.
त्यासाठी नागरिकांना क्यूआर कोड देण्यात आला असून, त्यावर ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसांत सुमारे दोन हजार नागरिकांनी अभिप्राय नोंदविला आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर धडक कारवाई मोहीम राबविली आहे. अवैध धंदे, जुगार अड्डे, दारू अड्डे नेस्तानाबूत करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा ही दिला आहे.

आता त्याचे पुढेचे पाऊल म्हणजे थेट नागरिकांना पोलिस दलाच्या कामकाजाबद्दल मत व्यक्त करण्याची संधी दिली आहे. त्यातून पोलिस दलाच्या चांगले उपक्रम आणि चुका लक्षात येणार आहेत. या मोहिमेचा उद्देश नागरिकांचे मते जाणून घेण्याचा आहे. नागरिकांच्या सूचना व अभिप्राय गोळा करून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आणि सेवा अधिक लोकाभिमुख बनवणे हा आहे. पोलिसांनी अंमलात आणलेल्या विविध उपाययोजना, वाहतूक नियंत्रण, महिला सुरक्षेबाबतचे उपाय, सायबर गुन्हेगारीविरोधातील कारवाई, तसेच अंमली पदार्थांविरोधात कारवाई अशा गोष्टींवर नागरिकांनी आपला अभिप्राय द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या नागरिकांनी ५० शब्दांत पोलिसांच्या कामगिरीबाबत आपला अभिप्राय मांडावा लागेल. तसेच, एकूण कार्यक्षमतेला १० पैकी गुण द्यावेत. याशिवाय वाहतूक, महिला सुरक्षा, अंमली पदार्थविरोधी कारवाई व सायबर गुन्हे या चार स्वतंत्र विभागांसाठीही १ ते १० या गुणश्रेणीत मूल्यांकन करावे लागेल. मत नोंदवताना नाव किंवा फोन नंबर देणे बंधनकारक नाही. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. नागरिकांनी दिलेले सर्व अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेद्वारे पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढून विश्वासाची नवी पातळी निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिक आणि पोलिस दलाचा सुसंवाद वाढवून त्याला बळकटी मिळावी. या उपक्रमातून प्रशासनातील सुधारणासंदर्भात नागरिकांचा आवाज ऐकू येणार आहे. त्यातून पोलिस दलाचे कामकाज लोकाभिमूख व पारदर्शक करण्यासाठी चालना मिळणार आहे. हाच या मोहिमेचा हेतू आहे.
-सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक