Ahilyanagar News : उमारठी (मध्यप्रदेश) येथून दोघांनी चार पिस्तूल आणले. त्याची कुणकुण कोतवाली पोलिस ठाण्यात लागताच सापळ्यात अडकले. स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरून कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना मोटारीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार पिस्तूल, ३४ जिवंत काडतुस, ३ मोबाईल फोन असा ८ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोहण राजू गाडे (वय ३०, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, मुळ रा. गाडेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे), नवनाथ अंकुश ढेणे (वय २९, रा. घर नं. सुरभी कॉलनी रोड, आपटे सोसायटी, वारजे माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १० जुलै २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, क्लेरा ब्रुस, हायस्कूल ग्राऊंड, अहिल्यानगर येथे लाल रंगाची स्विफ्ट मोटारकारमध्ये दोन व्यक्ती पिस्तूल अग्निशस्त्र घेऊन थांबले असून, ते पुण्याला जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक दराडे यांनी तत्काळ उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड यांना पथकासह जाऊन छापा घालण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस पथकाने क्लेरा ब्रूस, हायस्कुल मैदान परिसरात सापळा लावला. त्यांना लाल रंगाची मोटारकार मैदानावर उभी दिसली. त्यात दोन व्यक्ती बसलेल्या होत्या. पोलिसांनी मोटारीच्या चोहीबाजून कडे करून छापा घातला असता मोटारीतील दोघे गरबडले. त्यांना नावे विचारली असता त्यांनी रोहण गाडे, नवनाथ ढेणे अशी नावे सांगितली. त्यांच्या मोटारकारची झडती घेतली असता चार पिस्तुल (अग्निशस्त्र), २ मॅग्झिन, ३४ जिवंत काडतुस, ३ मोबाईल फोन व मोटारकार असा एकूण आठ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीत त्या दोघांनी पुण्यातील चॉकलेट नावाच्या व्यक्तीला मारण्यासाठी मध्यप्रदेशातून स्वतः विकत पिस्तुल आणल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देखमुख, कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, अभय कदम, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.