श्रीगोंदा- तालुक्यात मे महिन्यात जोरदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करत २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी तसेच लागवड केली. मात्र मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने आढे वेढे घेण्यास सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी घोड लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी केली. मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी चालू वर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार समाधानकारकरीत्या पाऊस पडेल, या भरवशावर शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती करत कपाशी, बाजरी, उडीद, सोयाबीन इत्यादी बियाणे खरेदी करून तालुक्यात सुमारे २९ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर लागवड व पेरणी केल्या.

मात्र मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने आढे वेढे घेण्यास सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असून शेतकऱ्यांची नजर आता आकाशाकडे लागले असून, आता या पिकांना पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील फळबाग शेतकरी देखील चिंतेत आला आहे.