अहिल्यानगर- चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले विविध कंपन्यांच्या वाणाचे बियाणे उगवले नसल्याच्या ८२ तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. यावर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने ७६ शेतकऱ्यांच्या शेतात स्थळ भेटी देऊन पाहणी केली आहे, अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामात आतापर्यंत ९३ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या हतबल आहेत. त्यात यावर्षी चालू खरीप हंगामात विविध कंपन्याच्या वाणाचे बियाणाची उगवण न झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत.

यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबिन, उडीद, मूग, बाजरी आदी बियाणे उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. चालू खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या ८२ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. बियाणाची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीसंदर्भात सुमारे स्थळ भेटी दिल्या. तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने ८२ पैकी ७६ शेतकऱ्यांच्या शेतात जावून स्थळ भेटी देऊन पाहणी केली आहे. या समितीत कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने बोगस बियाणे पेरल्या शेताची पाहणी केली. दरम्यान, बियाणे बोगस असेल तर शेतकऱ्यांना यापुढे संबंधित बियाणे कंपनीविरोधात तक्रार करता येणार आहे.
बाधित शेतकऱ्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागणे सोयीस्कर व्हावे, यासाठी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीची सरंचना केली. बियाणे बोगस आढळल्यास शेतकऱ्यांना बियाणे कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करतेवेळी पक्के बिल घ्यावे. बियाणाची पिशवी जपून ठेवावी. तालुका बियाणे तक्रार निवारण समितीच्या भेटीवेळी स्वतः हजर राहून माहिती द्यावी. बोगस बियाणासंदर्भात व्यापक तक्रारी असल्यास कृषी विभागाच्या वतीने नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.