अकोले तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापिकेकडून विनयभंग आणि छळ

Published on -

अकोले- तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षकाविरुद्ध अश्लील वर्तन, छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडीत विद्यार्थिनी ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, सन २०२३ मध्ये ती इयत्ता आठवीमध्ये असताना शाळेच्या निवासी हॉस्टेलमध्ये राहात होती. त्यावेळी शाळेतील शिक्षक धुपेकर याने तिचा व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला. घडलेला प्रकार विद्यार्थिनींनी शाळेची मुख्याध्यापिका कुलथे हिला सांगितला असता तिने “हा प्रकार घरी सांगू नका” असे सांगितले. त्यानंतर धुपेकर याची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली.

दरम्यान शाळेतील गभाले नावाची शिक्षिका पीडितीची सातत्याने मुलांच्या नावाने चेष्टा करत तिला त्रास देत असे. नववीमध्ये असताना सफाई कामगार धांडे हा शाळेच्या आवारात आणि हॉस्टेलमध्ये पाठलाग आणि कपडे धुत असताना जवळ उभे राही. या गोष्टी पुन्हा एकदा मुख्याध्यापिका कुलथे हिला सांगितल्या, पण हा प्रकार कोणाला सांगितला तर शाळेतून काढून टाकू, अशी धमकी कुलथे हिने दिली.

त्यानंतर मुख्याध्यापिका कुलथे हिने पीडितेला वारंवार त्रास दिला. दि. २१ जुलै २०२५ रोजी कुलथे हिने तिला पुन्हा त्रास दिला. तो सहन न झाल्याने पीडितेने शाळेतील मोबाईलवरून आईला कॉल
करून दोन वर्षांपासून घडत असलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ही तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणात शिक्षक धुपेकर, कर्मचारी धांडे, मुख्याध्यापिका कुलथे आणि शिक्षिका गभाले या संशयित आरोपींच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३६२/२०२५ अन्वये बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ८, १२, १७ आणि भारतीय न्याय संहिता कलम ७५ (एक) (चार), ७४, ३५१ (दोन) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!