राहुरी- राहुरीतील मुलनमाथा भागात राहत असलेल्या २३ वर्षीय विवाहित तरुणी खुशबू सिमरान पिंजारी हिचा पती, सासू आणि सासऱ्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या छळानंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खुशबू पिंजारी ही घरात असताना तिचा मुलगा अर्थ घरातून रस्त्यावर पळून गेला. याच कारणावरून तिचा पती सिमरान मुनाफ पिंजारी, सासू परविन मुनाफ पिंजारी आणि सासरे मुनाफ पिंजारी या तिघांनी तिला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर ‘तू डोक्याचे केस स्वतः काप, नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. पीडितेने भीतीपोटी स्वतःच डोक्याचे केस कापले. यानंतर ‘तू वेडी झाली आहेस’ असे जबरदस्तीने तिला बोलायला लावण्यात आले. या घटनेनंतर खुशबू हिच्या माहेरच्यांनी तिला सासराहून माहेरी नेले. मात्र तिथूनही पतीने सतत फोन करून शिवीगाळ केली व ‘मुलाला मारून टाकीन, तुझ्यावर पोलिसात खोटे गुन्हे दाखल करीन’ अशा धमक्या दिल्या. दि. २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता खुशबू पिंजारी सासरी गेली असता तिला पुन्हा शिवीगाळ करण्यात आली आणि ‘तुला मुलगा देणार नाही, इथे राहू नकोस’ असे म्हणत तिला घराबाहेर हाकलण्यात आले.
खुशबू सिमरान पिंजारी हिने अखेर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती सिमरान मुनाफ पिंजारी, सासू आणि सासरे मुनाफ पिंजारी (सर्व रा. मुलानमाथा, ता. राहुरी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५१ (२), ३५२, ८५ नुसार गुन्हा क्रमांक ८१९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.