कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश

Published on -

टाकळी ढोकेश्वर- कुकडी डाव्या कालव्यातून सिंचन सुविधा मिळत असली तरी कालव्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वस्तीवरून शेतामध्ये जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने पिंपळनेर, म्हसे, जवळा, नारायणगव्हाण, वडगाव गुंड, निघोज, अळकुटी या परिसरातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होती.

या प्रश्नाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित झावरे पाटील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या वेळी झावरे यांनी कुकडी कार्यक्षेत्रात कालव्यातून पाणी आल्यानंतर बागायती क्षेत्रात वाढ झाली असली तरी मूलभूत सोयीअभावी येथील शेतकरी त्रस्त आहेत, त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे ही काळाची गरज असल्याचे विखे पा. यांच्या निदर्शनास आणत कालवा क्षेत्रातील विविध गावांमध्ये पूल व इतर पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून कामे हाती घेण्याबाबतचे निवेदन विखे पाटील यांना सादर केले.

या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवेदनाची दखल घेत तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आवश्यक त्या सर्व पूल प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे कुकडी डाव्या कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतात थेट पोहोचण्यासाठीचा मार्ग सुकर होणार आहे. उद्योगी आणि कृषीप्रमुख तालुक्यातील पायाभूत विकासात हा मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!