अहिल्यानगर : भिंगार येथील मोरे मळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत पाहणे एकाचा जीवावर बेतले आहे. या शर्यतीत एक बैलगाडा शर्यतीचा मार्ग भरकटल्याने प्रेक्षकांमध्ये घुसला आणि झालेल्या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा.बोल्हेगाव गावठाण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आलमगीर ते मोरे मळा रोडवर घडली.
याबाबतची माहिती अशी की आबासाहेब मल्हारी गोरे व गोकुळ अनिल पवार (दोघे रा.मोरे मळा, भिंगार, अ.नगर) यांनी संगनमत करुन २९ जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीचा मार्ग आलमगीर ते मोरेमळा जाणारे रोडवरुन मोरे मळा असा ठरवला.

आयोजक आबासाहेब गोरे आणि गोकुळ पवार यांनी शर्यतीसाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही. तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता बैलगाडा शर्यत सुरु केली. शर्यतीच्या दरम्यान होणाऱ्या आवाजाच्या गोंधळाने एका बैलगाड्याने त्याचा मार्ग सोडून तो थेट प्रेक्षकांमध्ये घुसला.
तेथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या संजय आसाराम जाधव यांना बैलाची जोराची धडक बसली. या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकाराने मोरे मळा परिसरात मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर विभाग) अमोल भारती, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आबासाहेब गोरे आणी गोकुळ पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.