नगरच्या व्यावसायिकास गुजरातमध्ये घातला ४० लाखांचा गंडा

Published on -

अहिल्यानागर : गुजरातमधील अपना भारत या प्रायव्हेट फंडिंग कंपनीकडून हवाला मार्फत २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नगर मधील हॉटेल व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल रमेश भांबरे (वय ३३, रा. रुईछत्तीसी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नगर सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी येथे हॉटेल आहे. त्यांनी सन २०१८ मध्ये नगरमधील पिरामल फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज घेतलेले होते. या कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी फायनान्सचे कर्मचारी जयंत मधुकर कंठाळी येत असत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये फिर्यादी भांबरे यांनी कंठाळी यांना मला पैशांची आवश्यकता आहे, त्यामुळे माझे कर्ज टॉपअप करून द्या असे म्हणाले असता तुमचा सिबिल कमी आहे. त्यामुळे टॉपअप होणार नाही पण दुसरी व्यवस्था करतो. असे सांगितले. त्यानंतर कंठाळी याने दुसऱ्या दिवशी फोन करून भांबरे यांना गुजरात मधील एका प्रायव्हेट फंडिंग कंपनीकडून हवाला मार्फत २० कोटींचे कर्ज मिळू शकेल. त्यासाठी २० लाख रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल असे सांगितले.

माझा मित्र सागर उर्णे याच्याकडेच ते काम आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भांबरे व कंठाळी हे दोघे सागर उर्णे याला भेटले व त्याला १० लाख टोकन दिले. त्यावेळी उर्णे म्हणाला की, आपल्याला कदाचित गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जावे लागेल. त्यानंतर काही दिवसांनी कंठाळी याने भांबरे यांना फोन करून आपल्याला कर्जाच्या कामासाठी पुण्याला जावे लागेल असे सांगितले. त्यामुळे १ मार्च रोजी भांबरे, कंठाळी, सागर उर्णे, योगेश घुले व गणेश शिंदे हे पुणे येथे गेले.

तेथे विमाननगर येथे एका कॅफे मध्ये गणेश शिंदे याने आपल्याला गुजरातला जावे लागेल, त्यानंतर तेथे प्रोसेसिंग फी म्हणून २० लाख रुपये रोख दिले की, संध्याकाळ पर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत आपल्याला २० कोटी रुपये हवाला मार्फत मिळून जातील. त्यावेळी भांबरे यांनी यात काही फसवणूक होणार नाही ना अशी विचारला केली असता गणेश शिंदे याने त्याची सर्व जबाबदारी माझी असेल असे म्हणत विश्वास दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण विमानाने गुजरात येथे गेले.

तेथे अपना भारत नावाच्या फायनान्स कंपनी ऑफिस मध्ये त्यांना गणेश शिंदे याने अनुराग पटेल याची भेट घालून दिली. त्यांच्या बोलणी झाल्यावर ५ मार्च रोजी अनुराग पटेल याने कोर्टाच्या आवारात एक माणूस करारनामा करण्यासाठी पाठविला. करारनामा झाल्यावर भांबरे यांनी त्याच्याकडे २० लाख रुपये दिले. दुसऱ्या दिवशी अनुराग पटेल याने २० कोटींच्या विमा उतरविण्यासाठी आणखी १० लाख रुपये मागितले. त्यावेळी भांबरे यांना संशय आल्याने तुम्ही अगोदर २० कोटीची रोकड दाखवा असे म्हणाले असता अनुराग पटेल याने व त्याच्या सोबतच्या व्यक्तींनी भांबरे यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांच्याकडील १० लाखांची रोकड हिसकावून घेतली.

आपली फसवणूक झाली असल्याने आणि आपण पर राज्यात असल्याने घाबरून भांबरे व कंठाळी हे दोघे तेथून नगरला निघून आले. त्यानंतर अनेकदा अनुराग पटेल व इतरांशी संपर्क साधूनही त्यांनी घेतलेले ४० लाख परत न दिल्याने भांबरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!