अहिल्यानगर- व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी मोटारकार अडवी लावून अपहरण केले. त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन फोन पेद्वारे १ लाख ४० हजार ट्रान्सपर केले. तर, खिशातील २० हजारांची रोकड काढून घेतली. ही घटना ६ जुलै रोजी एमआयडीसीतील साईबन रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्निल वेंकटेश मेहेत्रे, हर्षद गौतम गायकवाड, विश्वजित वसंत माने (तिघे रा. वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) व अन्य एका अनोळखी व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत सुरेश सखाहरी म्हसे (रा. डेअरी चौक, शेंडी बाह्यवळण रस्ता, पाण्याच्या टाकीजवळ अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी सुरेश म्हसे यांचा शिलाई मशिनचा व्यवसाय आहे. ते ६ जुलै रोजी दुपारी एमआयडीसी परिसरातील साईबन रस्त्याने जात असताना वरील आरोपींनी चारचाकी मोटारकार रस्त्यात अडवी लावली. त्यांना रस्त्यात अडवून बळजरीने मोटारीत बसून नेले. त्यांचा मोबाईल हिसकून घेत फोन पे द्वारे स्वप्निल वेंकटेश मेहेत्रे याच्या फोन पे अकाउंटवर एक लाख ४० हजार रुपये ट्रान्सफर केले.
तसेच खिशातील वीस हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. याप्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोटारीतून ढकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल टेमकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.