संगमनेरात वृक्षारोपणावर आधारित ‘कार्बन क्रेडिट’ प्रकल्प राबवावा — आमदार सत्यजित तांबे.

Published on -

थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 2006 साली संगमनेर तालुक्यात व शहरात ‘दंडकारण्य अभियान’ ही पर्यावरणपूरक चळवळ सुरू झाली. त्यानंतर सौ. दुर्गाताई तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मागील 18 ते 20 वर्षांत शहरामध्ये व्यापक प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या नियोजनबद्ध वृक्षारोपणामुळे संपूर्ण शहराचे सुशोभीकरण झाले असून संगमनेर अधिक आकर्षक आणि हरित बनले आहे. जास्त वृक्षामुळे शहराचे तापमान घटले असून पर्यावरण रक्षणा सोबत शहरासाठी एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग होण्यासाठी कार्बन क्रेडिट प्रकल्प तातडीने राबवावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

आ.सत्यजित तांबे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांनंतर एकमेव असे शहर आहे, जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाली आहे, आणि केवळ लागवडच नव्हे तर त्याचे संगोपनही अत्यंत नेटकेपणाने झाले आहे. परिणामी संगमनेर नगरपरिषदेला वृक्षारोपण, स्वच्छता व पर्यावरणविषयक उपक्रमांसाठी शासन आणि विविध संस्थांकडून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत व भविष्यातही मिळतील, याची खात्री आहे. या यशस्वी वाटचालीची पायाभरणी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात झाल्याचे विसरता येणार नाही.

या वृक्षलागवडीचा मूळ उद्देश केवळ झाडे लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण एवढाच मर्यादित नसून, नगरपालिकेसाठी उत्पन्नाची विविध साधने निर्माण होणे हा देखील हेतू होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, या व्यापक वृक्षलागवडीमुळे संगमनेर शहराचे सरासरी तापमान 1 अंश सेल्सियसने घटले असल्याचे अनेक तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

आता वेळ आली आहे, या पर्यावरणीय पुढाकाराचे ‘मॉनिटायझेशन’ करण्याची आणि त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याची. यासाठी ‘कार्बन क्रेडिट’ हा एक अत्यंत उपयुक्त आणि जागतिक पातळीवर स्वीकारलेला पर्याय आहे. जगभरातील अनेक शहरे व संस्था वृक्षलागवडीद्वारे कार्बनचे शोषण करून त्याचा उपयोग ‘कार्बन क्रेडिट्स’ म्हणून विक्रीसाठी करतात. हे क्रेडिट्स उद्योगसमूह, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इतर प्रदूषणकारी घटकांकडून खरेदी केले जातात, जेणेकरून ते आपल्या कार्बन उत्सर्जनाचे संतुलन साधू शकतील.

यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळू शकते. संगमनेर शहरात गेल्या 20 वर्षांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झालेली असल्याने, येथील हरित क्षेत्राचा सखोल अभ्यास करून कार्बन क्रेडिट प्रकल्पाची अंमलबजावणी करता येऊ शकते. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे, प्रत्येक झाडाचे स्थान, वय, प्रजाती यांचा तपशीलवार लेखाजोखा तयार करणे आणि त्याची प्रामाणिक नोंदणी करणे आवश्यक आहे.

तरी संगमनेर नगर परिषदेकडून या दृष्टीने पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणासोबतच शहरासाठी एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग खुला होण्यासाठी कार्बन क्रेडिट प्रकल्प तातडीने राबवावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!