सोनई- शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक आणि तेल अर्पण केल्याचा खोटा मजकूर ऑनलाइन पसरवून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर शाखेच्या वतीने शिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात अॅपधारक, मालक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सायबर पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे (वय ३२) यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, शनैश्वर देवस्थानच्या अर्जावर सायबर शाखेने केलेल्या तांत्रिक चौकशीत ऑनलाईन प्रसाद, पूजा परिसेवा, हरिओम आणि ई-पूजा या संकेतस्थळांवरून खोटी माहिती पसरवून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले.

या वेबसाईट्सचे मालक व धारकांनी श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व धर्मादाय आयुक्तांची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच देवस्थानास कोणतेही देणगी न देता, शनी महाराजांच्या शिळेचा, मंदिर व महाद्वाराचा फोटो वापरून पुजेसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केली होती. इतकेच नव्हे तर, त्यांचे कोणतेही पुजारी शिंगणापूर येथे वास्तव्यास नसतानाही, त्यांनी पूजा, अभिषेक व तेल अर्पण केले जाईल, असा खोटा मजकूर संकेतस्थळांवरून प्रसारित केला होता.
या खोट्या माहितीच्या आधारे भाविकांकडून अनियमित दराने रक्कम स्वीकारून आर्थिक फायदा घेण्यात आला. त्यामुळे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे व भाविकांचे नुकसान झाले. या प्रकाराबाबत सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले आणि कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून फिर्याद देण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांनी कारवाई न केल्यामुळे सायबर शाखेने वरिष्ठांच्या आदेशाने स्वतः फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (३), ३(५) तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ ड अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अहिल्यानगर सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम या प्रकरणाचा तपास करत आहेत.