अहिल्यानगर- घराच्या फर्निचरचे काम घेऊन लेखी करारनाम्या प्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करुन कराराप्रमाणे निर्धारित वेळेत काम केले नसल्या बाबत विचारणा केली असता तुमचे काम करणार नाही असे सांगून पैसे माघारी न देता तिघांनी ४ लाख ५१ हजार रुपयाची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सिमरन संजय पंजाबी, हिमांशू खत्री, अर्जुन खत्री पूर्ण नाव माहीत नाही असे संशयित आरोपींची नाव आहेत. याबाबत शुभम अशोक फुंदे (वय २६, रा. भिंगार) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीत म्हटले, की क्लासेसची प्रिंटिंग, लग्नपत्रिकेचे काम करीत असताना सिमरन संजय पंजाबी यांची ओळख झाली होती.

त्या ओळखीतून त्यांना सहकारनगर येथे फ्लॅटचे फर्निचरचे काम ठेकेदार सिमरन पंजाबी व त्याच्या साथीदारांना फर्निचर काम करण्यासाठी ९ लाख ६९ हजार रुपयांचे कोटेशन सांगितले होते. त्यासंदर्भात लेखी करारनामा केला. त्यानुसार ४ लाख ५१ हजार रुपये दिले. काम करताना ठेकेदाराने ठरल्याप्रमाणे मटेरियल न वापरल्याचे लक्षात आले.
इंटेरियर डिझायनर आदित्य सोनवणे व प्रकाश सुतार यांना सांगून कामाची पाहणी केली असता त्यांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. कराराप्रमाणे ठरलेल्या निर्धारित वेळेत काम केले नाही पैसे मागितले असता पैसेही दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.