राहुरी- वाढदिवसाच्या निमित्ताने मित्राला जेवायला घेऊन जातो, असे सांगून एका युवकाने आपल्या मित्रालाच घराबाहेर पाठवून त्याच्या घरातून एक लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २० जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी सचिन मच्छिद्र ढोकणे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दत्तात्रय ज्ञानदेव काळे वय ४७, हे उंबरे येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी घरातील शोकेसच्या ड्रॉवरमध्ये १ लाख रुपये रोख ठेवले होते. २० जुलै रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता काळे हे घरात एकटेच होते. यावेळी त्यांचे मित्र सचिन ढोकणे आणि सोपान दुशिंग भेटण्यासाठी घरी आले. काही वेळ गप्पा झाल्यावर ढोकणे म्हणाला, “आज माझा वाढदिवस आहे, चला तुम्हाला जेवायला घेऊन जातो.” त्यानुसार तिघेही जेवणासाठी निघाले.

काळे आणि दुशिंग मोटारसायकलवर बसले, मात्र ढोकणेने त्याची मोटारसायकल चालू होत नसल्याचे सांगून थांबण्याचा बहाणा केला. काळे आणि दुशिंग पुढे गेले आणि व्यंकटेश हॉटेलमध्ये जेवण करून सायंकाळी ६ वाजता परतले. तेव्हा दत्तात्रय काळे यांच्या आईने सांगितले की, त्यांच्या मागे ढोकणे पुन्हा घरात आला होता आणि काहीतरी घेऊन गेला. यावरून काळे यांनी ड्रॉवरची पाहणी केली असता १ लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. घरात व परिसरात शोधाशोध करूनही रक्कम न सापडल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरून सचिन मच्छिद्र ढोकणे, रा. उंबरे, ता. राहुरी याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.