अहिल्यानगर- शहरातील नवीन टिळक रस्त्यावर लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रुपये व राज्य शासनाकडून १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली.
अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, रमेश साळवे, भन्ते राहुल बोधी, महागायक आनंद शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाला एकता, समता व बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये, संविधानामध्ये आहे. आज येथे उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याचा व विचारांचा खऱ्या अर्थाने गौरव आहे. शिक्षण, समता व बंधुता ही डॉ. बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक नियमितपणे प्रेरणा देणारे ठरेल.
याप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, प्रा. जोगेंद्र कवाडे, पुतळा समितीचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, महानगरपालिका जलअभियंता परिमल निकम, भन्ते राहुल बोधी यांनी मनोगत व्यक्त केले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रास्ताविक केले. तर उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचलन केले.
पुतळ्याची वैशिष्ट्ये
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक हे नवी दिल्ली येथील नव्या संसद भवन अर्थात सेंट्रल व्हिस्टा, या वास्तूच्या प्रेरणेने साकारण्यात आले आहे. या स्मारकात १५ फूट उंचीचा चौथारा असून त्यावर १० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कास्य धातूपासून साकारलेला पुतळा उभारला आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी रूपये १६ लाख ७९ हजार इतका खर्च आला आहे. या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी ६६ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे.