अहिल्यानगर-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याला जिल्ह्याच्या हद्दी बाहेर सोडले. जाबीर सादीक सय्यद (रा. शहा कॉलनी गोविंदपुरा, ता. जि. अहिल्यानगर) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सराईत गुन्हेगार जाबीर सय्यद याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या मान्यतेनुसार तो प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. २९ जुलै रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जाबीर सय्यद याच्या हद्दपारीच्या प्रस्तावास मान्यता दिली.

त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तत्काळ मुकुंदनगर येथून जाबीर सय्यद यास ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यास जिल्ह्याच्या हद्दी बाहेर सोडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार रेखा पुंड, किरण बर्वे, इसराईल पठाण, पांडुरंग बारगजे, दीपक शिंदे, रवी टकले यांच्या पथकाने केली.