अहिल्यानगरच्या शिरपेचाच मानाचा तुरा! ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांचा लंडनच्या ‘हाऊस ऑफ पार्लमेंट’मध्ये होणार सन्मान; जगातल्या २५ सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये निवड

Published on -

अहिल्यानगर : श्रीरेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह अर्बन क्रेडीट संस्थेच्या माध्यमातून समाजभान जपत, सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांनी मोठी गरुड भरारी घेतली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल आतापर्यंत त्यांना मिळालेल्या शेकडो पुरस्कारानी घेतली आहे.

मात्र या सर्व पुरस्कारावर नुकताच त्यांना लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने जगभरातील २५ सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये त्यांची निवड करून कळस चढविला आहे. जुलै २५च्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडची राजधानी लंडनच्या ‘हाऊस ऑफ पार्लमेंट’ मध्ये अर्थतज्ञ डॉ भालेरावांना अत्यंत मानाचा असा गेस्ट ऑफ ऑनर देऊन गौरवण्यात येणार आहे.यावेळी डॉक्टर भालेराव नवउद्योजकासह उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

जगप्रसिद्ध लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्कील डेव्हलपमेंट या नामांकित संस्थेने नवोदित उद्योजकांना प्रेरणा मिळावी. अर्थार्जन व संकलना बरोबरच समाज भान जपण्याची शिकवण मिळावी या उद्देशाने संपूर्ण जगभरातील अशी दूरदृष्टी असलेल्या २५ अग्रेसर उद्योजकाची निवड करून त्यांच्या जीवनपटाची माहिती एकत्रित संकलित करण्यात आली आहे. ही निवड जगभरातून उच्च व्यावसायिक गुणानुसार काम करणाऱ्या व्यावसायिकामधून करण्यात आली असून ‘ या संकलित लिखाणाचे प्रकाशन १० जूलैला लंडनच्या हाऊस ऑफ पार्लमेंट मध्ये होत आहे.

त्यानंतर १२ जुलैला त्याचे ऑनलाईन प्रकाशन देखील होणार आहे तर १६ रोजी एका विशेष सोहळ्यात निवड केलेल्या उद्योजकांना गेस्ट ऑफ ऑनर देऊन गौरविण्यात येणार आहे. तो स्विकारून तेथील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे निमंत्रण अर्थतज्ञ डॉ. भालेराव यांना मिळाले आहे.

१० जुलैला गुरुपौर्णिमा असून श्री रेणुका आईसाहेब त्यांच्या गुरु असल्याने श्री क्षेत्र अमरापुरच्या श्री रेणुका देवस्थानात सालाबादपणे गुरु पौर्णिमेचा मोठा उत्सव आहे. त्यामुळे ते १० व १२ च्या सोहळ्यास उपस्थित न राहता थेट दि १६ च्या गेस्ट ऑफ ऑनर च्या सोहळ्यास हजेरी लावून ते नवउद्योजकानां मार्गदर्शन देखील करणार आहेत.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून देशातील ९ राज्यात १३९ शाखा द्वारे आपल्या कार्याचा पाया रोवला. ते रेणुकामाता इंन्फो सोल्युशन्स लिमिटेड, (पुणे) ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड, (अहिल्यानगर), चंद्रकांत मंगल’ व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, (पुणे) आणि रेणुकामाता प्रॉडक्शन हाऊस, (मुंबई) या संस्थाचे संस्थापक असून अध्यक्षीय धूरा सांभाळत आहेत, रेणुकामाता सिक्युरिटीज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, (मुंबई) ही संस्थाही त्यांचे मालकीची असून या संस्थाच्या माध्यमातून त्यानी अत्यंत पारदर्शी कामकाज करत सातत्याने सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. म्हणूनच असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (नवी दिल्ली) च्या सदस्यपदीही त्यांची दोन महिन्यापूर्वी नियुक्ती झाली आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन डॉ भालेराव यांची या सर्वोच्च सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!