श्रीगोंदा- तालुक्यातील पेडगाव परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कोल्ह्याने संपत झिटे आणि ज्ञानदेव झिटे या दोघांना चावा घेतल्याने त्यांच्यावर श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वनविभागाने या घटनेची दखल घेतली असली, तरी संतप्त गावकऱ्यांनी एका कोल्ह्याला ठार मारले आहे. मात्र, स्थानिकांच्या मते, दुसरा कोल्हा अद्याप पळून गेला असून, त्याचा शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेने वन्यप्राण्यांपासूनच्या धोक्याबाबत आणि वनविभागाच्या तत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गावकऱ्यांंनी केले कोल्ह्याला ठार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेडगाव गावाकडे धाव घेतली. मात्र, त्यापूर्वीच संतप्त गावकऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ आणि परिसरातील धोका टाळण्यासाठी या पिसाळलेल्या कोल्ह्याला ठार मारले. स्थानिकांच्या मते, हल्ला करणारा कोल्हा पिसाळलेला होता आणि तो दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करत होता. गावकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई केली असली, तरी यामुळे वन्यप्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याची शक्यता आहे. वनविभागाने याबाबत तपास सुरू केला असून, गावकऱ्यांच्या या कृतीबाबत अधिक चौकशी होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या कोल्ह्याचा धोका
स्थानिक नागरिकांनी दावा केला आहे की, हल्ला करणारा कोल्हा एकच नसून, दोन वेगवेगळे कोल्हे होते, आणि त्यापैकी एक कोल्हा पळून गेला आहे. गावकऱ्यांनी एका कोल्ह्याला ठार मारले असले, तरी दुसरा कोल्हा अद्याप मोकाट आहे, ज्यामुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी वनविभागाकडे दुसऱ्या कोल्ह्याचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे.