संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) व त्यांच्या पत्नी नंदा रेवजी गायकर (वय ५५) यांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात की घातपात याबाबत अद्याप निश्चितता नसल्याने आश्वी पोलीस तपासात गुंतले आहेत.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गुरुवारी दि. १० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारास चेतन पुजा गायकर (रा. गोगलगाव, ता. राहाता) यांना एक फोन आला. यानंतर त्यांनी सादतपूर शिवारातील लवन वस्तीवर राहात असलेल्या आपल्या चुलते रेवजी गायकर यांच्या घरी धाव घेतली.

तेव्हा रेवजी गायकर हे घरात मृत अवस्थेत आढळून आले, तर चुलती नंदा गायकर या घरात दिसत नसल्याने शोध घेतला असता, घराशेजारील शेततळ्यात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
दुर्घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले;
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. डी. पारधी हे पुढील तपास करत आहेत.
गायकर कुटुंब मूळचे गोगलगाव येथील असून, रात्री उशिरा गोगलगावमध्ये दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमागचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.