Ahilyanagar News : घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून पकडलेल्या आरोपींकडून २५० ग्रॅम सोन्यासह २४ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अहिल्यानगर, सातारा, नाशिक व पुणे जिल्ह्यात १६ घरफोड्या केल्याचे तपासात समोर आले आहे.पकडलेल्यांमध्ये मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले (वय २८, रा.बेलगाव, ता. कर्जत), सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे (वय ३५, रा.नारायण आष्टा, ता. आष्टी, जि.बीड) व एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा (रा. बेलगाव, ता. कर्जत) यांचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यातील बोटा येथील श्रीमती शालिनी बाळशीराम शेळके यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २० जून रोजी सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत घारगाव पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर,सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमुण गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता.

या पथकास गुन्ह्याचे तपासाततांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपीतांचाशोध घेऊन मिलींद उर्फ मिलन ईश्वर भोसले, सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे व एका अल्पवयीन मुलास पकडले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार शुभम उर्फ बंटी पप्पु काळे (रा.एम.आय.डी.सी. अहिल्यानगर)(पसार), सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (रा. बेलगांव, ता. कर्जत) (पसार), संदीप ईश्वर भोसले (पसार), कुऱ्हा ईश्वर भोसले (पसार) अशांनी मिळून केल्याची माहिती सांगीतली.तसेच या सर्वांनी अहिल्यानगर जिल्हयातील घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर त्याचप्रमाणे पुणे, सातारा, नाशिक जिल्हयामध्येघरफोडीचे गुन्हे केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ताब्यातील आरोपी मिलींद ईश्वर भोसले याचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनिता उर्फ सुंठी देविदास काळे, रा.नारायण आष्टा, ता. आष्टी, जि.बीड व त्याची पत्नी कोमल मिलींद भोसले यांचे मार्फत सोनारास विकला असल्याचे व काही मुद्देमाल त्याने त्याचे नातेवाईकाचे घरामागे लपवून ठेवला असल्याची माहिती सांगीतली.
पथकाने पंचासमक्ष सोनाराने हजर केलेले ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व आरोपीने काढून दिलेला १९ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध वर्णनाचे दागीने, गुन्हयाचे वेळी वापरलेला गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुस, मोटार सायकल व लोखंडी कटावणी असा एकुण २४ लाख २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.