पुराच्या पाण्यात बिबट्या वाहत आला अन् संगमनेरमधील नागरी वस्तीत घुसला, नागरिकांची उडाली दाणादाण

Published on -

संगमनेर- प्रवरा नदीला आलेल्या पुरामध्ये वाहत आलेला बिबट्या संगमनेरच्या नागरी वस्तीमध्ये अचानक घुसल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या बिबट्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला शोधण्यासाठी वन खात्याने काल रात्रभर सर्च ऑपरेशन राबवुनही बिबट्या आढळला नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपासून संगमनेर-अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने प्रवरा, म्हाळुंगी या नद्यांना पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यामध्ये एक बिबट्या संगमनेरकडे वाहत आला. संगमनेर शहरातील प्रवरा नदीवरील छोट्या पुलाजवळ काही मुले पुराच्या पाण्याचे व्हिडिओ काढत होते. या मुलांना पाण्यामध्ये बिबट्या दिसला. मुलांना पाहून या बिबट्याने अचानक पुराच्या पाण्यातून उडी मारली. हा बिबट्या पाण्याच्या बाहेर आल्याने उपस्थित नागरिकांची पळापळ झाली.

या बिबट्याने त्वरित लगतच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात धाव घेतली. या ठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये तो बराच वेळ लपून बसलेला होता. काही वेळाने तो अदृश्य झाला. बिबट्या शहरामध्ये घुसल्याचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरताच अलकानगर, नायकवाडपूरा या भागातील नागरिक घराबाहेर
आले. वन खात्याचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. मात्र, उशिरापर्यंत शोध घेऊनही हा बिबट्या आढळला नाही. या बिबट्याचा शोध लागत नसल्याने वन खात्याचे कर्मचारीही बुचकाळ्यात पडले आहेत.

बिबट्याची माहिती मिळताच आमचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्च ऑपरेशन राबवले. मात्र, बिबट्या आढळला नाही. बिबट्या आढळला असता तर त्याला इंजेक्शन मारून ताब्यात घेता आले असते. वन खात्याचे अजूनही प्रयत्न सुरूच आहेत.

– सागर केदार,
वनपरिक्षेत्र अधिकारी, संगमनेर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!