कोपरगाव- बिबट्या आपल्या नातवाला ओढून नेत असतानाचे पाहून आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बिबट्याला पळवून लावून नातवाचा जीव वाचवला.
अशा शुरविर असणाऱ्या आहेर यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे, बाभळेश्वर विद्यमान संचालक सिताराम खंडागळे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव येसगाव येथील शेतात ही थरारक घटना नुकतीच घडली आहे.

धाडसी आजोबा मच्छिद्र आनंद आहेर यांनी आपल्या नातवाचे कुणाल अजय आहेर याचे प्राण वाचवत गावात धैर्याचे नवे उदाहरण घालून दिले आहे. सकाळच्या ११ वाजेच्या वेळेस आजोबा आनंद आहेर आपल्या नातवाला घेऊन शेतात गेले होते. कुणाल काही अंतरावर खेळत असताना बाजूला असलेल्या उसाच्या शेतातून अचानक एक बिबट्या समोर आला आणि थेट त्याच्यावर झेपावला.
क्षणाचाही विलंब न करता आनंद आहेर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या नातवाला मागे ओढून घेतले आणि मोठ्याने आरडाओरड करून आणि दगड फेकून त्यांनी बिबट्याला गोंधळून टाकले. शेवटी बिबट्या उसाच्या शेतात परत गेला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांच्या धैर्याचे भरभरून कौतुक करत सन्मान केला आहे.
यावेळी वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या बाभळेश्वर संस्थेचे विद्यमान संचालक सिताराम खंडागळे, हनिफ तांबोळी, अॅड. कुणाल झाल्टे, अनिल कोल्हे, अविनाश गिरी, सलीमभाई सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.