कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा, वराडे वस्ती, अचानक नगर परिसरात बिबट्याची जोडी नुकतीच आढळून आली आहे. ही बिबट्याची जोडी गेल्या आठ दिवसांपासून रात्री-अपरात्री राजरोस फिरत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप नवले यांना त्यांच्या उसाच्या शेतात एका बिबट्याने दर्शन घडले. त्याचा फोटो कुणाल लोणारी यांनी काही फुटावरून काढला. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम असून तातडीने वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी प्रदीप नवले यांनी केली आहे.

मात्र, वनविभागाकडे पिंजरे शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले आहे. वनविभागाच्या वतीने आता बोकड, अथवा मांसाहारी पदार्थ परिसरात ठेवावेत म्हणून सल्ला देण्यात आला. त्यानुसार आता लोकवर्गणी गोळा करून त्याची तजवीज केली.
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांसह शाळा, कॉलेजात येणारे विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. या बिबट्यांनी चार शेळ्या फस्त केल्या आहेत. वनविभागाच्या वतीने एक पिंजरा लावण्यात आला आहे.
गेल्या २४ तारखेपासून ते बिबटे या परिसरात आहेत. अमोल वराडे यांच्या चारएकर उसाच्या परिसरात ते लपले आहे. त्यामुळे संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल परिसर, धोंडीबा नगर, अचानक नगर, खिर्डी गणेश परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
या बिबट्यांनी गोविंद नगर परिसरातील चार जणांच्या मालकीच्या शेळ्या मारून खाल्ल्या आहेत. त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत, असे शेतकरी अमोल दराडे यांनी सांगितले. तसेच सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, एक कर्मचारी कामावर जात असताना त्याच्यावर बिबट्याने झेप घेतली होती.
मात्र, तो त्यातून बालंबाल बचावला, असेही वराडे म्हणाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन एक पिंजरा लावला असून आणखी दोन पिंजरे लावण्यात यावेत, अशी परिसरातील शेतकरी व नागरिकांची मागणी आहे.