करंजी- पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचे एका धोकादायक वळणाजवळ ब्रेक नादुरुस्त झाल्याने ट्रॅव्हल बस समोरील दरीत पडली. या वेळी बसमध्ये सुमारे ३१ प्रवासी होते. त्यामधील सात ते आठ जण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन महिला, पाच पुरुषांचा समावेश आहे.
अपघात घडल्यानंतर एसटी बसने करंजी, तिसगाकडे प्रवास करणारे सचिन खंडागळे, सतीश क्षेत्रे, सूरज मिरपगार यांनी देखील जखमींना मदत केली. तर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी हेसद्धा घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहोचले, त्यांनी जखमींना बाहेर घेऊन पुढील उपचारासाठी नगरला पाठवले. जखमीच्या मदतीसाठी तिसगाव, पाथर्डी, नगर येथून रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या.

मध्यरात्री घाटात ट्रॅव्हलला अपघात झाल्याने या ठिकाणी मोठा गोधळ उडाला. करंजी मार्गे दररोज रात्रीच्या वेळी शंभराहून अधिक ट्रॅव्हल बीड- गेवराई- माजलगाव- परभणी मार्गे मुंबईकडे जात असतांना नगर – पाथर्डी मार्गे प्रवास करताना करंजी घाटातील एक याच धोकादायक वळणावर नेहमी अपघात होत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धोकादायक वळणाची दुरुस्ती करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर या घाटाची रुंदी व दुरुस्ती होणार, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. रस्ते अपघात प्रकरणी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी ज्या ठिकाणी सातत्याने अपघात घडतात त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. करंजी घाटातील ट्रॅव्हल बस अपघातात राजेश वाघमारे, इम्रान सय्यद, शंकर माने, जाधव व बसचालक जगताप यांच्यासह सात ते आठ जण गंभीर जखमी आहे