पाथर्डी तालुक्यात सोलर कंपनीकडून घेतली २० लाखांची खंडणी आणखी १ कोटींची खंडणी मागणाऱ्या आकाला पोलिसांनी केली अटक

Published on -

पाथर्डी- जीएसई रिनेवेबल इंडिया प्रा. लि., मुंबई या कपंनीला सोलर प्लँटसाठी दैत्यनांदूर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन देतो, त्यासाठी मला खंडणी द्यावी लागेल, असे सांगून वीस लाख रुपयांची खंडणी घेतली. आणखी एक कोटीची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अशोक राधाकिसन दहिफळे व प्रसाद अशोक दहिफळे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अशोक दहिफळे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अशोक दहिफळेला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दैत्यनांदूर गावात जीएसई रिनेवेबल इंडिया प्रा.लि, मुंबई या कपंनीला सोलर प्लँटसाठी जागा खरेदी करावयाची होती. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून अशोक दहिफळे यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ओळख झाली. मी तुम्हाला गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी खेरदी करून देतो, मात्र, त्यासाठी मला खंडणी द्यावी लागेल, असे अशोक दहिफळे व प्रसाद दहिफळे यांनी शैलेश रामलोटन सिंह सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले.

खंडणी दिली नाही म्हणून गावातील लोकांना कंपनीच्या विरोधात भडकावून देत कंपनीचे कामही अशोक दहिफळे याने बंद पाडले होते. त्यामुळे जागा खरेदी करण्यासाठी व कंपनीचे काम सुरू करून देण्यासाठी अशोक राधाकिसन दहिफळे याने त्याच्या बँक खात्यावर ९ लाख १२ हजार २१ रुपये व प्रसाद अशोक दहिफळे याच्या खात्यावर ११ लाख रुपये अशी वीस लाख रुपयाची खंडणी घेतली.

त्यानंतरही अशोक दहिफळे याने सोलर कंपनीचे विजेचे पोल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये येत असल्याने ते पोल काढून घेण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले. तसेच कपंनीच्या विरोधात वीज वितरण कंपनी आणि पंचायत समिती सार्वजिनक बांधकाम विभागाकडे व मुख्यमंत्री आपले सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या आहेत. तसेच आणखी एक कोटीची खंडणी मागितली.

२०२३ पासून आतापर्यंत वीस लाख रुपयाची खंडणी बँक खात्यावर अशोक व प्रसाद यांनी घेतलेली आहे. कंपनीचे अधिकारी शैलेश रामलोटन सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. अशोक राधाकिसन दहिफळे याला अटक करण्यात आली. प्रसाद दहिफळे हा फिर्याद दाखल करताना पोलिस ठाण्याच्या आवारातून पसार झाला आहे. तपाशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी अशोक दहिफळे याला न्यायालयात हजर केले.

न्यायाधीश ए.एस. सपाटे यांनी दहिफळे याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादीच्या बाजूने अॅड. वैजीनाथ बडे यांनी बाजू मांडली. तपाशी अधिकारी गुट्टे यांनी आणखी एक आरोपीस अटक करावयाची असून, खडंणी म्हणून घेतलेली रक्कम वसूल करावयाची आहे, यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.

सोलर कंपनीला ब्लॅकमेल करून लाखोची खंडणी वसूल करण्यामध्ये आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. खंडणी घेणाऱ्यांना कोणाची मदत होती का? खंडणीचे घेतलेले पैसे कोणाकोणाला दिले गेले आहेत, याचा तपास पोलीस घेत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचीदेखील यामध्ये जबाबनोंदविले जाणार असल्याचे समजते. खंडणीचे नेमके भागीदार कोण आहेत. यामध्ये आकाचा आका कोणी असेल का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!