अहिल्यानगर- अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे तक्रारी केल्या असून दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्यापि त्यावर कार्यवाही झालेली नाही. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाहीत. रस्ते शोधावे लागतात. पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत.
प्रशासक, ठेकेदार व लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून महापालिकेत घोटाळा झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह या स्कॅमची फाईल पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

महापालिकेतील स्कॅम संदर्भात शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांनी मंगळवारी मुंबईत खासदार राऊत यांची समक्ष भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ती फाईलच सरकारला दिली आहे. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेतील प्रशासक व अधिकारी संगणमताने शासकीय तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रकरण धक्कादायक आहे.
शहरातील सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत ७७६ रस्त्यांच्या कामात सुमारे ३५० ते ४०० कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा घोटाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. तुमचे महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना ८ मे २०२३ रोजी त्यांनी पहिली तक्रार महापालिका तत्कालीन आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती, मात्र त्याबाबत काहीही झाले नाही, असे पत्रकात म्हटले आहे.