अहिल्यानगर- प्रवासी सेवा अधिक सुखकर व्हावी, या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा ‘अ’ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरू झाले आहे. परीक्षण समितीचे सदस्यांनी सोमवारी (दि.२८) तारकपूर, स्वस्तिक चौक व माळीवाडा या तीन बस स्थानकांचे परीक्षण केले. उर्वरित तीन बस स्थानकांचे परीक्षण मंगळवारी करण्यात येणार आहे.
प्रवाशांची सेवा अधिक सुखकर व्हावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन अनेक नवनवीन संकल्पना राबवीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांच्या सेवेला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने स्पर्धात्मक अभियान हाती घेण्यात आले. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक असे या अभियानाला नाव देण्यात आले. वर्ष २०२३-२४ हे या अभियानाचे पहिले वर्ष होते. अ, ब, क वर्ग अशा तीन क्रमवारीत बसस्थानकांचे परीक्षण गुणांसह करण्यात येत आहे.

पहिल्या वर्षाचे परीक्षण झाल्यानंतर राज्यातील स्वच्छ व सुंदर बसस्थानकांचा यथोचित गौरव करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे. या वर्षात पहिल्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण झाले असून आता ‘अ’ वर्ग बस स्थानकांचे परीक्षण २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये करण्यात येत आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी समितीचे प्रमुख नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्यासह पत्रकार महेश देशपांडे महाराज, रणजीत श्रीगोड आणि वरिष्ठ प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने यांनी तारकपूर, माळीवाडा व स्वस्तिक चौक बसस्थानकाचे परीक्षण केले.
यावेळी अहिल्यानगर विभागीय सांख्यिकी अधिकारी मयुरी दिकोंडा, तारकपूर आगाराचे बसस्थानक प्रमुख अविनाश कल्हापुरे, वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे, सुरेंद्र कंठाळे, ऋषिकेश सोनवणे, गोविंद पिडीयार, किशोर केरूळकर, नितीन गाली आदी उपस्थित होते.
या सोयी-सुविधांची केली जाते पाहणी
समिती सदस्यांनी तीनही बस स्थानकाचा आवार, फलाट, स्वच्छतेची व्यवस्था, स्वच्छतागृह, चालक-वाहक यांच्या निवासाची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण कक्ष, उद्घोषणाची यंत्रणा, बसस्थानकात लावण्यात आलेले विविध मार्गावरील फेऱ्यांचे सूचना फलक याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या परीक्षणांचे गुणांकन करण्यात येत आहे. यातूनच उत्कृष्ट बसस्थानकांचा गौरव करण्यात येणार आहे.
या बसस्थानकांचे होणार परीक्षण
अहिल्यानगर जिल्ह्यात ‘अ’ वर्ग दर्जाची तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक चौक, श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर ही सहा बस स्थानके आहेत. या सहा वर्ग बस स्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरू झाले. बसस्थानकांचे परीक्षण करणाऱ्या या समितीचे प्रमुख राज्य परिवहन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे आहेत. नागपूर प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने, ज्येष्ठ पत्रकार महेश महाराज देशपांडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड या परीक्षण समितीचे सदस्य आहेत.