अहिल्यानगर- नगर-पुणे झेंडा चौकाजवळ पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. तिने दुचाकी नीट चालवता येत नाही का असे म्हणाल्याचा राग येऊन दोन तृतीयपंथी नागरिकांनी तिला बेदम मारहाण केली. ही घटना १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दोन तृतीयपंथी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जखमी महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या एका कंपनीत कार्यरत आहेत. १५ जुलै रोजी सायंकाळी काम संपवून फिर्यादी या त्यांची सहकारी महिलेसह रंगोली हॉटेल येथे कंपनीच्या बसमधून उतरल्या. त्यानंतर त्या दोघी पायी झेंडा चौकाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तृतीयपंथीय व्यक्तींनी फिर्यादी यांना उजव्या बाजूने धक्का दिला.

यावर फिर्यादी यांनी त्यांना दुचाकी नीट चालविता येत नाही का असे म्हणाल्या. त्याचा राग येऊन त्या दोघांनी त्यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी पुढे चालत असताना त्यांनी पाठलाग करीत पुन्हा शाब्दिक वाद केला. एकाने फिर्यादी यांचे केस पकडून मारहाण केली, तर दुसऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारले.
एका तृतीयपंथीयाने त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळे नाकाचे हाड तुटले आणि रक्तस्राव सुरू झाला. फिर्यादी यांनी आरडाओरड करताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्या दोघांपासून त्यांना सोडवले. जखमी महिलेस उपचाराकामी खासगी रुग्णालयात नेले. पोलिस हेडकॉन्स्टेबल गोविंद गोल्हार गुन्ह्याचा तपास करीत आहेत.