राहुरी – एका युवतीने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि प्रयत्नांमुळे मरणासन्न अवस्थेतील एका निष्पाप गिर गायीच्या वासराचे प्राण वाचले.
दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ऋतुजा कैलास कांबळे वय २५ वर्षे, रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता, जि. अहिल्यानगर या पुणे येथून ताहाराबाद मार्गे कानडगावकडे जात असताना, ताहाराबाद ते कानडगाव दरम्यानच्या घाटामध्ये जंगलात त्यांना अंदाजे दोन ते तीन दिवसांच्या वयाचे एक गिर गायीचे वासरू काटेरी झुडपात अडकलेले आणि मरणासन्न अवस्थेत आढळून आले.

ऋतुजा कांबळे यांनी परिसरातील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्या वासराला काटेरी झुडपातून बाहेर काढले. त्याला पाणी पाजून जवळच्या शेतकऱ्यांना त्याचे पालनपोषण करण्याबाबत विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिला.
वासरू कुठे ठेवावे, याबाबत ती चिंतेत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व जया संजय ठेंगे हे त्या मार्गावरून जात असताना त्यांचे लक्ष त्या वासराकडे गेले. त्यांनी ऋतुजाशी संवाद साधून संपूर्ण प्रसंग जाणून घेतला. त्यानंतर वासराला गोशाळेत ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गोषाळेत वासराला ठेवण्यासाठी त्याचे चारा खाण्याचे वय पूर्ण झालेले नसल्यामुळे त्याला तत्काळ गोशाळेत प्रवेश मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे ऋतुजाने त्याला राहुरी पोलिस स्टेशन येथे आणले. ठाणे अमलदार बबन राठोड यांना याची माहिती दिली आणि ज्याचे हे वासरू असेल, त्याने घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच तोपर्यंत वासराला स्वतः सांभाळण्याची तयारी ऋतुजा यांनी दर्शवली.
राहुरी पोलिस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की, लहान वासरे धोकादायक स्थितीत कोणीही सोडू नये. अशा परिस्थितीत वासरांचा सांभाळ करणे शक्य नसेल, तर परिसरातील गोशाळांना संपर्क करून त्यांच्याकडे वासरे सुपूर्त करावीत.