नेवासा- आम आदमी पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज असून सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणे हाच निवडणूक अजेंडा असणार आहे. तसेच कोणत्याही युतीशिवाय, पूर्णपणे स्वबळावर आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अजितराव फाटके यांनी केले.
रविवारी नेवासा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष अजितराव फाटके बोलत होते. यावेळी फाटके यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीचा कें द्रबिंदू विकास, पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि भ्रष्टाचारविरोधी लढा असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली लूट केली आहे. गटारे, रस्ते, शाळा, पाणी योजनामध्ये टक्केवारीचा बाजार मांडला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टी याचा भंडाफोड करणार आहे.

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही आरोपच करत नाही आहोत, तर यामागे ठोस कागदोपत्री पुरावे असून, वेळ आल्यावर आम्ही ते जनतेसमोर मांडणार आहोत. त्यांनी स्थानिक पातळीवरील शैक्षणिक, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, वीज समस्या आणि रोजगाराच्या संधी, या सर्व प्रश्नांवर आम आदमी पार्टीची ठाम भूमिका आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू आघाव, तालुका अध्यक्ष अॅड. सादीक शिलेदार, संदीप आलवने, अहिल्यानगर शहराध्यक्ष भारत खाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, तिलक डुंगरवाल, देवराम सरोदे, किरण भालेराव, रामचंद्र लाड, अॅड. शिंदे, अशोक डोंगरे, करीम सय्यद, आण्णा लोंढे, शंकर शिंदे, विठ्ठल मैंदाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आगामी निवडणुकीत आप नेवासा शहरात स्थानिक नेतृत्व देणार आहे. तसेच आजी-माजी सत्ताधारी आमदार या सर्वांचे नगरपंचायत विषयी कामकाजाचे धोरण मांडले व नेवासाकरांचे अनेक प्रश्न उपस्थित केले.
जनता पारंपरिक पक्षांना कंटाळली आहे. आम्ही संघटन बांधणी करत आहोत आणि प्रामाणिकपणावर आमचा विश्वास आहे. आमचे राजकारण लोकांच्या प्रश्नांवर आधारित आहे. त्यामुळेच हा आत्मविश्वास आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत यश देईल, असे आपचे नेवासा तालुका अध्यक्ष अॅड. सादीक शिलेदार यांनी सांगितले.