अहिल्यानगर : सध्या शेतकरी शेतातून शाश्वत उत्पन्न कसे मिळेल याबाबत प्रयत्नशील असतात. असाच काहीसा प्रयोग अकोळनेर येथील प्रयोगशील शेतकरी नाथा देशमुख यांनी केला आहे. त्यांना हैदराबाद येथून आणलेल्या गुलछडी रोपातून पत्येक महिन्याला ८० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. कमी-अधिक प्रमाणात पुढील तीन ते चार चार वर्ष असेच उत्पन मिळत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोळनेर परिसर तसा गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीचे आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील काही युवा शेतकऱ्यांनी तर थेट पॉली हाऊस, शेडनेट उभारून फूलशेती सुरू केली आहे. तसेच येथील नाथा देशमुख हे प्रयोगशील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी थेट हैदराबाद येथून गुलछडीची रोपे मागविली.

सुरवातीला अर्धा एकरात त्यांनी गुलछडी लागवड केली. सहा इंच अंतरावर सलग रोपांची लागवड केली. दोन्ही बाजूला सव्वा फूट अंतर सोडले. त्यांना अर्धा एकर लागवडीसाठी ७० हजार रूपयांच्या आसपास खर्च आला. ते संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीने पिकवितात. त्यामुळे गुलछडीही त्यांनी सेंद्रीय पद्धतीनेच घेण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी जीवामृत, सर्व प्रकारचे जीवाणू, गांडूळ खत आदींचा वापर सुरवातीपासूनच केला.
रोग, कीड नियंत्रणासाठी सेंद्रीय पद्धतीने बनविलेल्या स्लरीचाच वापर केला. त्यामुळे हवामान बदलले तरी रोगराईचा परिणाम त्यावर झाला नाही. चांगले उत्पादन त्यांना मिळू लागले. गुलछडीच्या सभोवती असलेले गवत ते शेताबाहेर टाकत नाहीत. गवत उपटून ते जागेवरच टाकतात. तेच गवत पुन्हा खत म्हणून त्या पिकाला उपयोगी ठरत आहे. शेतातील कामाला त्यांना पत्नीची साथ लाभत आहे. गुलछडीची फुले तोडण्यासाठी ते मजुरांचीही मदत घेतात. ते शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करतात.
गावरान, बेंगलोर गुलछडीला आपल्याकडे जास्त मागणी आहे. तसेच शेतकरीही त्याचेच उत्पादन घेतात. त्यामुळे देशमुख यांनी हैदराबादहून बेंगलोर गुलछडीचे रोपे आणले. त्याचीच लागवड केली. इतर शेतकऱ्यांकडून त्यांनी याबाबत माहिती घेतली. मात्र, लागवडीनंतर त्यांनी स्वत:च्याच पद्धतीने सेंद्रीय खते देण्यास तसेच फवारणी करण्यास सुरवात केली. त्यांनी रोगाचा प्रादुर्भाव होऊ दिला नाही. त्यामुळे सुरवातीपासूनच गुलछडी अगदी जोमात राहिली. तीन महिन्यानंतर फुले येऊ लागली.
त्यांना दररोज कमीत कमी ३० ते ४० किलो व जास्तीत ६० ते ७० किलो प्रमाणे फुले मिळू लागली. सध्याही दररोज कमीत कमी ५० किलो फुले त्यांना मिळतात. विशेष म्हणजे ते वाशी (मुंबई) मार्केटला दररोज फुले पाठवितात. तेथे भावही सध्या १०० ते १२० रूपये प्रति किलो मिळत आहे. सरासरी ५० किलो फुले दररोज मार्केटला गेली तर त्यांना ५ हजार रूपये दररोज मिळतात. खर्च वजा जाता सरासरी त्यांना १ लाख रूपये महिना मिळतो.