शिर्डी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Published on -

राहाता- शिर्डी येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा निकाल काल मंगळवारी लागला असून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या सखोल तपासामुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील प्रभावी युक्तिवादामुळे या गंभीर गुन्ह्याला योग्य तो न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मागील भांडणाच्या कारणावरून खून करणाऱ्या अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात यास सेशन कोर्ट, राहाता यांनी जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याबाबत हकीकत अशी, की दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात (रा. जवळके, ता. कोपरगाव) व रोहीत बंडु खरात (रा. शिर्डी, ता. राहाता) यांनी अक्षय थोरात याच्या शिर्डी येथील जोशी शाळेजवळील साई बजरंग जनरल अँड स्टेशनरी नावाच्या पत्र्याच्या गाळ्यामध्ये मयत अजय कारभारी जगताप (रा. तळेगाव, ता. संगमनेर) यास तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून लोखंडी कोयत्याने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले आणि ठार मारले.

या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते (पोलीस स्टेशन, शिर्डी) यांनी शासकीय फिर्याद दिल्याने शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २९६/२०२१ भादंवि कलम ३०२, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (२) ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून हे प्रकरण अंडर ट्रायल होते. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सखोल तपास करून आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

काल मंगळवार दि. २२ जुलै २०२५ रोजी, या प्रकरणाचा निकाल लागला. भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२, ३४, हत्यार कायदा कलम ४/२५ व अॅट्रॉसिटी कायदा १९८९ चे कलम ३ (२) ५ अंतर्गत आरोपी अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात यास न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी दोषी ठरवून जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याच्या यशस्वी निकालामध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने यांचे मार्गदर्शन लाभले.

तपास पथकात पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, कोर्ट अॅडली हेड कॉन्स्टेबल सुभाष माळी, कॉन्स्टेबल बनकर, विशाल शिराळकर यांचा सहभाग होता. तर, सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. बी. डी. पानगव्हाणे यांनी युक्तिवाद केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!