श्रीगोंदा- जिल्हा रुग्णालयाच्या नावाने ‘युडीआयडी’ क्रमांकाने दिलेले अनेक दिव्यांग प्रमाणपत्र चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय नोकरदारांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्यासह सरकारी कामात विविध लाभ घेतले असल्याचे निदर्शनात येत असल्याने दिलेली बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करून अशी प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी.
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सतीश बोरुडे, अजिनाथ मोतेकर, संदीप कुनगर आदी उपस्थित होते.

या निवेदनात जिल्हा रुग्णालयाने युडीआयडी प्रमाणपत्र काढण्यासाठीचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ हा गोपनीय न ठेवता रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर टाकून कायद्याचा भंग केलेला आहे.
त्यामुळे दिव्यांग नसताना अनेकांनी दिव्यांगाची चुकीची प्रमाणपत्र काढली असल्याचे दिसून येत आहे. तीन सदस्यीय बोर्डने दिव्यांग व्यक्तींची तपासणी न करता केवळ तज्ज्ञ डॉक्टरने तपासणी केली व अन्य दोन सदस्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या जिल्हा रु दिव्यांग प्रमाणपत्रांवर टाकण्यात आल्या.
यात डॉक्टरांनी अनेकजण दिव्यांग नसताना दिव्यांग दाखवले असल्याचा आरोप करत दिव्यांगाचे युडीआयडी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन तसा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात येऊन हे अधिकारी तातडीने निलंबित करावेत. सर्व बोगस प्रमाणपत्र तातडीने रद्द करुन सर्व दिव्यांगांची फेर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. दिव्यांग प्रमाणपत्राचे कामकाज पाहणारे पूर्वीचे डॉक्टर व कर्मचारी यांना या प्रक्रियेपासून तातडीने दूर करण्यात यावे यासह अनेक गोष्टींची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.