संगमनेर- भोजापूर धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरवेळेस ओव्हरफ्लो होत होते. परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते. पण यंदा ओव्हरफ्लोचे पाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातुन तब्बल ४० वर्षानंतर नान्नज दुमाला शिवारात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोण या भागातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, सोनेवाडी, कहे, सोनोशी, नान्नज दुमाला, धनगरवाडा व तिगाव माथा, या दुष्काळी गावांचे भवितव्य या भोजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

या पुरचारीला पाणी यावे, यासाठी या परिसराचे शेतकरी नेते आणि पूरचारीचे अभ्यासक किसन चत्तर यांनी सातत्याने जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि आ. खताळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आ. खताळ यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्या. नंतर मंत्री विखे यांनी ही भोजापूर चारी जल संधारण विभागाकडून काढून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली. अन् या पुरचारीचे अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा, असे सक्त निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानंतर आ. खताळ यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्या समवेत सोनूशी येथील गीते वस्तीजवळ समक्ष जाऊन पाहणी करत उर्वरित पुरचारीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यानुसार या पूरचारीचे अपूर्ण राहिलेले काम सुरू आहे. चालू वर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत नान्नज दुमाला, धनगर वाड्या पर्यंत पोहोचवायचेच आहे. असा निश्चय करून आ. खताळ व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत थेट भोजापूर धरणावरून भोजापूर पूरचारीचे पाहणी करून अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करा.
तसेच संगमनेरच्या हक्काचे पाणी तुम्हाला द्यावेच लागेल, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. अखेर भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी नान्नज दुमाला शिवारामध्ये दाखल झाले. पुरचारीला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील व आ. खताळ यांनीच आम्हाला पाणी मिळवून देण्याच्या भावना व्यक्त केल्या.
पूरचारीला लागलेली गळती थांबवा
भोजापूर पूरचारीला नाशिक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेक ठिकाणी गळती लागली आहे. ती गळती लवकरात लवकर थांबून योग्य नियमानुसार पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. मात्र, या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा विसर्ग वाढविण्याऐवजी तो कमी केला आहे. याचा जाब जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण विचारणार आहे.- किसन चत्तर, शेतकरी नेते व भोजापूर पूरचारीचे अभ्यासक