अहिल्यानगर- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस मंदावला आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग घटला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांत सुमारे ७० टक्क्यांवर पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा तीस टक्क्यांनी जास्त आहे. भंडारदरा धरणात सध्या ७४ टक्के, निळवंडे धरणात ८५.५४ टक्के, मुळा धरणात ७०.१० टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, आढळा, सीना व विसापूर ही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्ह्यात आतापर्यंत ११० मिमीवर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अद्यापही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणांत ८ हजार १६९ दशलक्ष घनफूट म्हणजे ७४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी भंडारदरा धरणांत ४४९३ दलघफू म्हणजे ४०.७० टक्के पाणीसाठा होता.

धरणात सध्या ३८९ दलघफू पाणी दाखल झाले. आठ टीएमसीच्या निळवंडे धरणात सध्या ७ हजार ११७ दलघफू म्हणजे ८५.५४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी निळवंडेत १४९० दलघफू म्हणजे १७.९१ टक्के पाणी होते. निळवंडेत सध्या ११३ दलघफू पाणी दाखल झाले आहे. २६ टीएमसीच्या मुळा धरणात सध्या १८ हजार २२६ दलघफू म्हणजे ७०.१० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी मुळा धरणात ८०९९ दलघफू म्हणजे ३१.१५ टक्के पाणीसाठा होता.
मुळा धरणात १२४ दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धरणांत दुप्पट पाणीसाठा आहे. १०६० दलघफू क्षमतेचे आढळा धरण शंभर टक्के भरले आहे. तसेच २४०० दलघफू क्षमतेचे सीना धरण व ९०५ दलघफू क्षमतेचे विसापूर धरण तुडुंब भरले आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील विसर्गात घट झाली. यामध्ये भंडारदरा धरणांत ८४० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भंडारदराच्या धरण परिसरात १४३४ मिमी पाऊस झाला. निळवंडे धरणात ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण परिसरात ६५४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत धरण पाणलोटात दुप्पटीने पाऊस झाला आहे.