अहिल्यानगर जिल्हा कृषी क्षेत्रात अन् दुधाच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर- जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया

कृषी दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्हा शेती व दुग्ध व्यवसायात राज्यात अग्रेसर असल्याचे सांगितले. शासकीय योजनांची अंमलबजावणी, खत वितरणासाठी ब्लॉगस्पॉट व शेतकऱ्यांना सन्मान देण्यावर भर दिला जात आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्याने तसेच हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांना लाभ झाला. अहिल्यानगर जिल्हा, तर कृषी क्षेत्र तसेच दुधासारख्या जोड धंद्यातही राज्यात अग्रेसर आहे. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी शेतीला ऊर्जितावस्थेत नेण्यासाठी अनेक पावले उचलली. परिणामी या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रगतीशील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून अधिकचे उत्पादन मिळवले आहे. 

सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. खतांची उपलब्धता होण्यासाठी आता ब्लॉगस्पॉटही सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे ध्येय समोर ठेवून शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजाणीचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन, शेतकरी मेळावा व शेतकरी पुरस्कार कार्यक्रम अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रासायनिक खतांच्या उपलब्धतेची सहज माहिती व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉगस्पॉटचे अनावरण करण्यात आले.

अनेकांची उपस्थिती

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रकल्प संचालक आत्मा प्रदीप लाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, विकास काळे, सोनाली हजारे, नीलेश अभंग आदी उपस्थित होते. शामसुंदर कौशिक यांनी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच पीक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, जिल्हा परिषद सेस फंड योजना, नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, राज्य कृषी विभाग यांत्रिकीकरण योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. प्रकल्प संचालक प्रदीप लाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्याचा सीईओ असणे अभिमानाची बाब

जि. प. सीईओ आनंद भंडारी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिकीकरण आणि कृषी क्षेत्रात भरीव काम करण्याचे आव्हान होते. सिंचनाच्या व्यवस्थेमुळे कृषी क्षेत्राला लाभ झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना उभा करून सहकाराची मुहुर्तमेढ रोवली. शेती व सहकार अशा जोडीमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला. अशा जिल्ह्याचा सीईओ असणे माझ्यासाठीही अभिमानाची बाब आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!