अहिल्यानगर- जिल्ह्यात जूनमध्ये ८०.१ मिमी, तर ११ जुलै अखेर २७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याची पावसाची सरासरी १०८ मिमी आहे. परंतु प्रत्यक्षात जून महिन्यात ८०.१ मिमी म्हणजे जून महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के पाऊस झाला.

जुलै महिन्यात आतापर्यंत २७.७ मिमी पाऊस झाला. दरम्यान, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांत चांगला पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १०७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नगर तालुक्यात ८८.७ मिमी, पारनेर १२९.९ मिमी, श्रीगोंदा १००.१ मिमी, कर्जत ९७.९ मिमी, जामखेड ६७.८ मिमी, शेवगाव ८८.३ मिमी, पाथर्डी ६५.७ मिमी, नेवासा ८५ मिमी, राहुरी १०९.२ मिमी, संगमनेर १३५ मिमी, अकोला २१४.४ मिमी, कोपगराव ११६.३ मिमी, श्रीरामपूर ७८.२ मिमी, तर राहाता तालुक्यात ९८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, अद्यापही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणांत ७ हजार ६३२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६८ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. आठ टीएमसीच्या निळवंडे धरणात ६ हजार ८१० दलघफू म्हणजे ८१.८५ टक्के पाणीसाठा आहे. २६ टीएमसीच्या मुळा धरणात १८ हजार २२६ दलघफू म्हणजे ७० टक्क्यांवर पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांतील विसर्ग
जिल्ह्यातील धरणांत सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामध्ये भंडारदरा धरणांत २०८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भंडारदराच्या धरण परिसरात १३७१ मिमी पाऊस झाला आहे. निळवंडे धरणात ४५१६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण परिसरात ६१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरण पाणलोटात दुप्पटीने पाऊस झाला असल्याचे दिसून येत आहे.